Sunday 12 January 2014

मोऱ्यांची खाणावळ

           रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वात म्हत्त्वाचं ठिकाण म्हणजे "चिपळूण"(...हा आणि आम्ही चिपळूणकर चिपळूणला चिपळूणच म्हणतो..."चिपलून" नव्हे). तर चिपळूण मधलं सर्वात चांगलं जेवण कुठे भेटतं ह्याची चवकशी केल्यावर निर्विवादपणे "मोऱ्यांची खाणावळ" हे नाव सुचवलं जाईल. आता छायाचित्रात "हॉटेल दीपक" असा फलक दिसला तरी..."मोऱ्यांची खाणावळ" हीच ह्या ठिकाणाची खरी ओळख....कारण ती वर्षानुवर्षे इथे येणाऱ्या लोकांनी निर्माण केलीय. "कोकणी पद्धतीचं मासांहारी जेवण ह्याच्यापेक्षा चांगलं...फक्त घरातच मिळू शकेल...आणखी कुठेच नाही" अशी माझी समजूत मटणाला "मतन" म्हणायचो...तिथ पासून आहे आणि महाराष्ट्रभरात फिरून खवय्येगिरी केल्यावर ती समजूत आणखीनच पक्की झालीय. 

         दिसायला एखाद्या कौलारू घरा सारखं, पण एकदा कि आपण आत शिरलो..आणि चुलीवर शिजवलेल्या मटणाचा सुवास येऊ लागला कि एखाद्या भान विसरवून टाकणाऱ्या स्वर्गीय स्वप्नासारखं सगळं वाटू लागतं. आणि तो अधून मधून मच्छी तळताना येणारा हळुवार गंध म्हणजे त्या स्वप्नात खुद्द अप्सरेने केलेला नृत्याविष्कार. 

 

         हो पण हे सगळं अनुभवत असताना तुमचे रोजचे "हॉटेली नखरे" बाजूला ठेवायला हवे. म्हणजे इथे एखाद्या मूळ पदार्थाचे १०० प्रकार मिळत नाहीत. मटण फ्राय आणि पारंपारिक मटण मसाला (म्हणजे सुखं आणि ओलं खोबर्याच्या वाटणात केलेलं मटण) हे दोनच पर्याय, तीच गोष्ट चिकनची. असं असल्यामुळेच मटण (खास करून...) हे मूळ मसाल्यामध्येच शिजवलं जातं आणि तेही "चुलीवर". मटणाचे खरे शौकीनच हि गम्मत समजू शकतात.

       तर लक्ष्यात ठेवा कधीही मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करत असाल तर ह्या ठिकाणाला आवर्जून भेट द्या...म्हणजे तुम्ही पारंपारिक कोकणी मांसाहारी जेवणाचे शौकीन असाल तर.....आणि नसाल तर इथे आल्यावर नक्कीच व्हाल!!!

Saturday 14 December 2013

अपुरं कोल्हापूर...!

मुंबईत राहत असताना प्रत्येक मुंबईकराला दर रविवारी कुठे ना कुठे तरी फिरायला जाण्याचा फ्याड असतो..तो फ्याड माझ्याही घराला आहेच!
तर अश्याच एका रविवारी "पुरेपूर कोल्हापूर" या पुऱ्या मुंबईत गाजलेल्या हॉटेलचा बेत ठरला..!


प्रत्यक्ष कोल्हापुरात हि कोल्हापुरी जेवण आमच्या घरातल्यांना फारसं रुचलं नव्हतं..आणि आता तर वर्हाड ठाण्यातच जात होतं! हा सगळा माझा अंदाज होता...घरातले सगळे उत्साहीच होते...पण शेवटी माझाच अंदाज खरा ठरला...म्हणजे...कुणालाच पुरेपूर कोल्हापूर मधलं जेवण पुरेसं आवडलं नाही!


आता ह्याची अनेक कारणं आहेत. पण सर्वात मोठं म्हणजे "मटण" हा प्रकार पिढ्यानपिढ्या आमच्या घरात भयंकर निष्ठेने पुजला जातो...आणि बहुतेकदा बाहेरच्या हॉटेलातील मटण हे अपेक्षाभंग करणारच असतं...य्हाला अपवाद एकाच आमच्या चिपळूण मधलं "हॉटेल दीपक"! कारण तिथे मेनू मध्ये शंभर प्रकार नसतात..मुळात मेनूच नसतो...आणि त्यामुळे...मटण हे मूळ ग्रेवीतच शिजवलं जातं! असो तर पुरेपूर
कोल्हापूरचं मटण आधी उकडून मग ऑर्डर नुसार मसाल्यात गरम करून दिलं जातं, जसं सगळीकडेच केलं जातं, त्यामुळे जो मटणाचा खरा रसिक आहे....त्याला हे आवडणं कठीणच!


बाहेरून एखाद्या चाळीसारखं दिसायला असलं तरी हॉटेलात जाणारी मंडळी उच्च मध्यम वर्गातली...वायफळ 'etiquette' पाळणारी साहेबांची पिल्लंच होती...कारण आमच्या चिल्लर पार्टीच्या 'थोडाश्या' गोंगाटामुळे त्यांना अपेक्षित असलेलं 'ambience' बिघडल्याचं त्यांच्या त्रासिक चेहऱ्यांवरून मी ओळखलं! असो तर सगळ्यांची ऑर्डर देऊन झाली. 'मटण' मसाला, 'मटण' फ्राय, मटण खर्डा हे तीन प्रकार थाळीच्या रुपात आले...थाळीत अपेक्षित तांबडा आणि पांढरा रस्सा तर होताच सोबत 'खिमा' हि होता. आता तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हे मुळात 'complementary' आहे...त्यामुळे जर मटण आवडलं तरच त्याचं कौतुक वाटतं! मटण फ्राय as usualच होतं, त्यातल्या त्यात मटण मसाला हा पदार्थ थोडाफार सगळ्यांना आवडला, पण खर्डा मटण...म्हणजे iconic मिरचीच्या ठेच्यात बनवलेला हा मटणाचा पदार्थ, एखाद्या सुप्रसिद्ध नटाच्या एखाद्या संपूर्णपणे flop झालेल्या चित्रपटासारखा निघाला! आणि तिथे "कुरकुरीत prawns' नावाची एक फसवणूक पण होती. ते सुद्धा एखाद्या bollywood च्या दिग्दर्शकाने 'Tarantino' च्या चित्रपटासारखा चित्रपट बनवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न वाटला.!


तात्पर्य  काय तर "कोल्हापुरी जेवणाचा मुंबईत आस्वाद घ्यायचा असल्यास स्वतः कोल्हापुरी जेवण बनवणं शिका किव्वा एखादा कोल्हापुरी मित्र शोधा आणि रविवारी दुपारी ऐन जेवण्याच्या वेळी त्याची विचारपूस
करण्यासाठी त्याच्या घरी जा."