Sunday, 12 January 2014

मोऱ्यांची खाणावळ

           रत्नागिरी जिल्ह्यातलं सर्वात म्हत्त्वाचं ठिकाण म्हणजे "चिपळूण"(...हा आणि आम्ही चिपळूणकर चिपळूणला चिपळूणच म्हणतो..."चिपलून" नव्हे). तर चिपळूण मधलं सर्वात चांगलं जेवण कुठे भेटतं ह्याची चवकशी केल्यावर निर्विवादपणे "मोऱ्यांची खाणावळ" हे नाव सुचवलं जाईल. आता छायाचित्रात "हॉटेल दीपक" असा फलक दिसला तरी..."मोऱ्यांची खाणावळ" हीच ह्या ठिकाणाची खरी ओळख....कारण ती वर्षानुवर्षे इथे येणाऱ्या लोकांनी निर्माण केलीय. "कोकणी पद्धतीचं मासांहारी जेवण ह्याच्यापेक्षा चांगलं...फक्त घरातच मिळू शकेल...आणखी कुठेच नाही" अशी माझी समजूत मटणाला "मतन" म्हणायचो...तिथ पासून आहे आणि महाराष्ट्रभरात फिरून खवय्येगिरी केल्यावर ती समजूत आणखीनच पक्की झालीय. 

         दिसायला एखाद्या कौलारू घरा सारखं, पण एकदा कि आपण आत शिरलो..आणि चुलीवर शिजवलेल्या मटणाचा सुवास येऊ लागला कि एखाद्या भान विसरवून टाकणाऱ्या स्वर्गीय स्वप्नासारखं सगळं वाटू लागतं. आणि तो अधून मधून मच्छी तळताना येणारा हळुवार गंध म्हणजे त्या स्वप्नात खुद्द अप्सरेने केलेला नृत्याविष्कार. 

 

         हो पण हे सगळं अनुभवत असताना तुमचे रोजचे "हॉटेली नखरे" बाजूला ठेवायला हवे. म्हणजे इथे एखाद्या मूळ पदार्थाचे १०० प्रकार मिळत नाहीत. मटण फ्राय आणि पारंपारिक मटण मसाला (म्हणजे सुखं आणि ओलं खोबर्याच्या वाटणात केलेलं मटण) हे दोनच पर्याय, तीच गोष्ट चिकनची. असं असल्यामुळेच मटण (खास करून...) हे मूळ मसाल्यामध्येच शिजवलं जातं आणि तेही "चुलीवर". मटणाचे खरे शौकीनच हि गम्मत समजू शकतात.

       तर लक्ष्यात ठेवा कधीही मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करत असाल तर ह्या ठिकाणाला आवर्जून भेट द्या...म्हणजे तुम्ही पारंपारिक कोकणी मांसाहारी जेवणाचे शौकीन असाल तर.....आणि नसाल तर इथे आल्यावर नक्कीच व्हाल!!!

No comments:

Post a Comment